दैनंदिन एकनाथी भागवत

 ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती ।
आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सदा ।।१-४८।।
संतांना ज्ञानाचा अभिमान नसतो आणि अज्ञानपणीचे सोंगही ते आणीत नाहीत. स्वरूपांतच ते स्थित असतात पण ही माझी स्वरूपस्थिती आहे याचे स्मरण किंवा विस्मरण त्यांना नसते. ते सहजतेनेच असतात. आत्मसाक्षात्काराच्या वेळी ज्या रोमांचादि लहरी उठतात तेवढे द्वैतही त्यांचे ठायी विरून गेलेले असते. विस्मय वाटण्याचीही अवस्था तेथून गेलेली असते. त्यांचा देहभाव असून नसल्यातच जमा असतो. 

देहाचा आंतबाहेरपणाही  त्यांना जाणवत नाही. देह आहे की पडला याचीही त्यांना आस्था नसते. त्यांची जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्था , ते त्या अवस्थांच्या पलीकडेच असल्यामुळे व्यर्थ ठरतात. ते पाहतात पण पाहण्याचा विषय व पाहणारा कोण त्यांतील द्वैत गेलेले असते त्यामुळे पाहणेच फक्त इतरांच्या दृष्टीला दिसते. कारण ते असणे व नसणे , अज्ञान व ज्ञान या प्राकृतिक भेदांपलीकडे असतात. 

अशा प्रकारच्या संतांनी या दैनंदिन चिंतनाच्या माझ्या प्रयत्नांना यश द्यावे. जे मी वाचतो किंवा जो विचार करतो त्याला सार्थकता त्यांनीच द्यावी; अशी विनंती आहे. पण विनंती केली म्हणूनच ते कृपा करतील असे नाही.  सूर्य जसा सदा प्रकाशमान असतो तसे ते कृपावंतच असतात. श्रीमदभागवतातील उद्धवाच्या निमित्ताने जे ज्ञान भगवंताने प्रकट केले तेच मी रोज चिंतन विषय या स्वरूपात वाचणार आहे. खरोखर मी एवढे बोलत आहे तोच संतजन म्हणत आहेत. "आमची स्तुती पुरे. आम्ही तुझ्या मनातच मन घालून तुझ्या शब्दांचे अनुसंधान ठेवून आहोत. तू तुझे कार्य सुरू कर. " त्यावेळी मला जो आनंद झाला तो, मेघागर्जनेने मोराला, मेघजलाने चातकाला व चंद्रकिरणांनी चकोराला होणाऱ्या आनंदासारखा उत्कट व सहज आहे. "

संतांनी म्हटला आपुला । तो भवाब्धी तरुनी गेला !
लेखक : श्री दिवाकर अनंत घैसास

Comments

Popular posts from this blog

दैनंदिन एकनाथी भागवत

दैनंदिन एकनाथी भागवत

दैनंदिन एकनाथी भागवत