दैनंदिन एकनाथी भागवत
देहीं देह विदेह केलें । शेखीं विदेहपण तेंही नेलें ।
नेलेंपणही हारपलें । उरीं उरलें उर्वरित ।।१-८३।।
आता मला ब्रह्माविषयी संशय आहे, पण गुरूंच्या कृपेने मी निःसंशय झालो - हे सगळे म्हणतांना दोन स्थितीतले जे द्वैत गृहीत धरावे लागते, म्हणजे संदेहावस्था व निःसंदेहावस्था - या द्वैताचाही मागमूस त्यांनी नष्ट केला.
ब्रह्मानुभूतीने साधक प्रथम विस्मयचकित होतो , पण गुरूंनी ती अनुभूती इतकी सहजरूप केली, दृढ व नित्य केली की आता तो विस्मयही वाटेनासा झाला.
बरे , बाह्य जगांतील क्षणभुक्त - नष्ट अशा आनंदातून बाहेर पडून साधक गुरुकृपेने स्वतःमध्येच स्वयंभू आनंद भोगतो ; पण गुरू आणखी असे करतात की आनंदभावातले भोज्य - भोक्ता हे द्वैतही नष्ट करतात , त्यामुळे "स्वानंद " ही ही अवस्था लयास जाते. गुरूंनी देवाची भक्ती हृदयात रुजविली व मी मोठ्या आवडीने देवाचा भक्त झालो , देवाची भक्ती करू लागलो , पण गुरूंनी आणखी कृपा केली व भक्ती करणारा सुद्धा देवच आहे अशी दृष्टी प्राप्त झाली.
भक्त नाही , भजन नाही व भक्तीचा विषय तो देवही वेगळा नाही असे तिन्ही, एखादी लाट उठते व विरते तसे - लयास गेले. साधक नमस्कार करायला गेला तर ज्याला नमस्कार करायचा ते नाही , नमस्कार करणारा वेगळा घटक नाही व अर्थातच नमन सुद्धा उरले नाही. नमस्काराची उर्मीच जिरून गेली. जी गोष्ट नमस्काराची तीच दर्शनाची. दर्शन घेणारा कोणीच नाही व दर्शन घेण्यासाठी समोर व्यक्त असे काहीच नाही, मग दर्शनाचा सारा सोहळाच रद्द झाला ! अशी ही जनार्दन स्वामींची विलक्षण कृपा आहे. "
द्वैतभावना आहे तोवरच साधना आहे.
लेखक : श्री दिवाकर अनंत घैसास
Comments
Post a Comment