दैनंदिन एकनाथी भागवत
ते वाग्विलास परमेश्वरी । सर्वांगदेखणी सुंदरी ।
राहोनि सबाह्य अंतरी । ग्रंथार्थकुसरी वदवी स्वयें ।।
" हे सरस्वती ! तू सार असार निवडून सार ग्रहण कसे करावे हे शिकवणारी बुद्धीच आहेस. इंद्रियांना, मनाला, सर्व शरीराला, चेतनरुपाने तूच प्रवृत्त करतेस व निवृत्तीची वृत्तीही तूच निर्माण करतेस. मी बोलतो ते तुझ्याच कृपेने. मला बोध होतो तो तुझ्याच कृपेने. मला ज्या प्रकाशात दिसते ते तुझ्याच कृपेने. तू मात्र स्वयंप्रकाशी आहेस. तू शिवाच्या अंगची शक्ती आहेस, ती अभिन्नपणे कशी आहेस ? नेत्रांत दृष्टीशक्ती असते, साखरेत अंगभूत गोडी असते, आणि फुलात सुगंध असतो, तशी तू अनादिसिद्धपणे शिवाशी एकरूप आहेस. चारी वाणींची अधिष्ठात्री तूच आहेस त्यामुळे ग्रंथाच्या अर्थाला गौरव तुझ्यामुळेच प्राप्त होतो. सारसारविवेक हे अध्यात्माचे पाहिले साधन. त्याचे प्राबल्य हंस दाखवितो. तो हंस तुझे वाहन आहे आणि म्हणूनच सहजपणे हंसारूढ अशी तू आमची विवेकबुद्धी जागृत ठेवतेस. तुझा हा महिमा परमहंस पदवीचे सिद्धच जाणतात. मुढांना विवेक कुठला ? आणि तुझे रहस्यमय रूप तरी कसे त्यांना कळणार ? तू निराकार आहेस साकार आणि विश्वाकारही आहेस. म्हणूनच ग्रंथातील मुख्य भागाचे लेखकाला अनुसंधान रहाते ते तुझ्याच कृपेने ! तुझी स्तुती ज्या वाणीने करावी ती वाणी हे तुझेच रूप ! त्यामुळे मी तुझी स्तुती करणे तूच शब्दमयी होऊन स्वतःची स्तुती करून घेतेस असेच होय. तूच वाग्विलास रूप, तूच परम - ईश्वरी सत्तारूप व सर्वांगसुंदरी अशी देवी मा
झ्या अंतरबाह्य राहून ग्रंथाची निर्मिती सुंदरच करतेस. हे निरूपणही चांगले होणे हे सदा प्रसन्न असणाऱ्या तिच्याच कृपेने शक्य होते. आणि ही जाणीव असल्यामुळे मी वक्ता आहे, मी ग्रंथकर्ता आहे वगैरे अभिमान माझ्या ठायी राहात नाही. ही वाग्देवतेची स्तुती वाणीनेच केली ! येथे द्वैत नाहीच. या सरस्वतीने बोल, बोलणे व न बोलणे असे भेदच उरु दिले नाहीत; आणि तरीही निरूपण करून घेतले. जे बोलायला अशक्य तेही शब्दात व्यक्त करून घेणारी तीच तू सरस्वती ! समुद्रावर जशा लाटा येतात तशी आत्मस्वरूपावर तूच शब्दांच्या लाटा उठवितेस व विलीनही करतेस. ब्रह्मानंदाचा जसा रसगुण आहे तो सरस्वतीरुप आहे त्यामुळे अभिन्नभावाचे आपल्याआपण समाधान होत आहे; आणि कथेचा ओघ निर्माण होतो आहे. "
सरस्वतीला अशुद्धता आवडत नाही.
लेखक : श्री दिवाकर अनंत घैसास
Comments
Post a Comment