दैनंदिन एकनाथी भागवत

 ते चैतन्याचे अलंकार । कीं ब्रह्मविद्येचे शृंगार ।
कीं ईश्वराचे मनोहर । निजमंदिर निवासा ।।१-३६।।
 " आज सज्जनांचे आनंदाने स्मरण करूया आणि त्यांना वंदन करूया. हे सज्जन कसे असतात ? चिदानंदाचे मेघच सर्वत्र वर्षाव करीत यावे तसे ते प्रेमळ आहेत. संतप्त लोकांना सज्जनांच्या संगतीत बरे वाटते, त्यांचा ताप निवतो, हे मेघ स्वानंदरूपी पाण्याचा वर्षाव करतात किंवा आमचे जीवन स्वानंदमय बनवतात. चैतन्याला जेव्हा वाटले की आपण काही अलंकार घालावेत, तेव्हा सज्जनरुपी दागिनेच त्याने धारण केले. ब्रह्मविद्या सज्जनांमुळेच शृंगारलेली अर्थात सुशोभित दिसते. ईश्वराला रहायला घर कुठले या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे ! अणूपेक्षा सूक्ष्म व ब्रह्माणडाहून व्यापक असा ईश्वर कुठे राहातो ?  या प्रश्नाला उत्तर म्हणजे तो सज्जनांच्या मनोरुपी मंदिरात राहातो. सज्जन म्हणजे ब्रह्मवस्तूचे निजस्थान ! सुखाला जेव्हा पूर्ण उल्हास वाटतो तेव्हा ते सज्जनरुपाने व्यक्त होत असते. लोकांना सज्जनांशिवाय अ

न्यत्र विश्रांती मिळत नाही तसेच विश्रांतीलाही  चांगले निवासस्थान सापडत नव्हते, तेव्हा तिने सज्जनांच्या ठिकाणी पाहिले तो सज्जन - हृदय हेच विश्रांतीचे आराम करण्याचे स्थान ! तिथे विश्रांती ही अगदी विश्वासाने राहाते. भूतदयेचे सागर म्हणजे सज्जन, करुणेचा जन्म त्यांच्या ठिकाणी झाला म्हणून सज्जन हेच तिचे माहेर आहे. निर्गुणाला सगुण साकार होण्याची इच्छा झाली म्हणून त्याने सज्जनांचे रूप घेतले व त्याला अवयव प्राप्त झाले. या सज्जनांचे काय वर्णन करावे ? नेत्रांतील दृष्टी व दृष्टीलाही पोषक अशी जी शक्ती ती सज्जनांजवळ असते. त्यांच्या चरणांगुष्ठामध्ये संतोषही संतोष पावतो. सज्जनांच्या केवळ दृष्टीनेच संसाराचे भय दूर होते. सज्जनांच्या कृपेसाठी भक्ताच्या मनात फक्त श्रद्धा असणेच पुरेसे असते. साधनचतुष्ट्याचे श्रम घ्यावे लागत नाहीत. विवेक, वैराग्य, सदाचार व भक्ती यातील भक्तीच ते पाहतात. ते सज्जन जगातच राहात असून विकल्पामुळे लोकांना ते दिसत नाहीत व सज्जन जगात नाहीत असेच लोक समजतात. एकलव्याने  द्रोणाचार्यांना  गुरू मानले आणि त्यांचा मातीचा पुतळा बनवून त्यांच्या साक्षीने धनुर्विद्येचा सराव केला, तरी तो अर्जुनापेक्षा वरचढ ठरला. हे श्रद्धेचेच बळ नव्हे काय ? मनात विकल्प म्हणजे संशय येऊ न देता सज्जनांच्या पायावर डोके ठेवावे. ते आत्मानुभवाला उणे पडू देणार नाहीत. "
नमन संतां करावे । हरी हरी गर्जावे ।।
लेखक : श्री दिवाकर अनंत घैसास

Comments

Popular posts from this blog

दैनंदिन एकनाथी भागवत

दैनंदिन एकनाथी भागवत