दैनंदिन एकनाथी भागवत
सूक्ष्माहुनी सूक्ष्म सान । त्या माजीं तुझे अधिष्ठान ।
यालागीं मूषकवाहन । नामाभिमान तुज साजे ।।१-१४।।
संत एकनाथ महाराज गणेशाची रुपकालंकाराने स्तुती करतांना म्हणतात -- " हे गणेशा, सुवर्णाचे अलंकार तुझ्या अंगावर आहेत म्हणून तेच शोभतात, आणि तू जो अंकुश व जो पाश धारण केला आहेस त्यांनी तू विवेकाची टोचणी लावून भक्तांना स्वतःजवळ ओढून घेतोस. तुझ्या हातावर ठेवलेला मोदक म्हणजे निरपेक्ष मनुष्याला तुजकडून मिळणार आत्मसुखरूपी प्रसादच होय. उंदीर हा सूक्ष्म जागी चपलपणे जातो तो तुझा वाहन आहे कारण तुझी गती सूक्ष्म जागीही होते. अर्थात गणेशा ! तुझे ज्ञान सूक्ष्मबुद्धीच्या स्तरावरच होऊ शकते. तुझे रूप पहावे तर साकार व निराकार यांच्या सीमारेषेवर आहे. नर व पशू यांचे सख्य पहावे ते तुझ्याच ठिकाणी.
उत्तम व दीर्घ स्मृती असणारा महान बुद्धिमान पशु जो गजराज त्याचे मस्तक तुला बुद्धिदाता म्हणून दर्शविते आणि मानवी तनू तुझे कार्य मानवांच्या उद्धाराचे आहे हे दर्शविते. तू ओंकार रूप आहेस म्हणूनच अमूर्त व समूर्त अशा सर्व सृष्टीचा तूच सार -- तत्त्वरूप देव आहेस ; आणि मी तुझी प्रार्थना करीत आहे आणि ती पूर्ण करणे तुझ्या दृष्टीने काहीच कठीण नाही; पण मला मात्र जे कार्य अवघड वाटते , ते तुझ्या कृपेने पार पडावे अशी श्रद्धापूर्ण प्रार्थना मी करीत आहे. तूच नाना युगांमध्ये नाना अवतार घेऊन दुष्टांना शासन आणि देवांचे व सज्जनांचे रक्षण करण्याचे कार्य लीलेने करतोस म्हणूनच हे विघ्नहरा ! एकनाथी भागवताचे तत्त्वदर्शन तुजकडूनच मला होईल अशी श्रद्धा धरून मी तुला वारंवार वंदन करतो. " मी " म्हणून अहंकाराने वंदन करणारा मी तरी बाकी कोठे उरतो ! तूच सर्वरुपी सर्वसाक्षी अनादिअनंत आहेस ! मजवर कृपा कर व ग्रंथ लेखनाचे कार्य तडीस ने हीच विनंती आहे. "
विद्या ज्ञान पराक्रम । योग भक्ती यांसी सम ।
श्रीगणेश प्रथम । वंदीतां कार्य साधतसे ।।
लेखक : श्री दिवाकर अनंत घैसास
Comments
Post a Comment