दैनंदिन एकनाथी भागवत

नमन श्री एकदंता । एकपणें तूंचि आतां ।
एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ।।१-२।।
 "जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरू. त्यांना एकनाथ महाराज ग्रंथारंभी द्वैत व अद्वैत यांतील भेदही वर्ज्य करून नमन करतात व नंतर श्रीगणेशाला वंदन करून  त्याची स्तुती करतात.
 हा श्रीगणेशा कसा आहे ? तो एकमेव असा देव आहे की जो एक असूनही अनेकता दाखवितो. त्याच्या ठायी अनेक ब्रह्माणडे मावलेली आहेत ह्याचे निदर्शक म्हणून तो लंबोदर म्हटला जातो. गणेशाचे परममंगल दर्शन जो प्रथम घेतो त्याचे इच्छित कार्य कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडते, म्हणून त्याला विघ्नहर म्हणतात. हे गणराजा ! तुझे मुख म्हणजे मूर्तिमंत आनंद ! चारी पुरुषार्थ म्हणजे तुझे चार हात. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारी पुरुषार्थ तुझ्या कृपेनेच पूर्ण होतात. तुला एक दात आहे पण तोच प्रकाशाचाही प्रकाशक ! 
सूर्य, चंद्र, तारे यांना प्रकाश मिळतो तो तुझ्या या एका दातापासून. कर्मकांडाचे प्रयोजन सांगणारी पूर्वमीमांसा आणि मोक्षमार्गाची शिकवण देणारा वेदांत म्हणजेच उत्तरमीमांसा या दोन्ही दर्शनांचे स्थान तुझ्या दोन्ही कर्णांच्या जागी असते. परा व पश्यनती या वाणी गुप्त खऱ्या,पण  त्याही मध्यमा व वैखरी या दोन्ही स्फुट वाणींबरोबरच तुझ्या मुखामध्ये निवास करतात. तुझी दृष्टी तर अशी आहे की, तीत सर्व सृष्टी आत्मरूपाने दिसते. त्या दृष्टीने सुख व संतोष, दोन्ही प्राप्त होतात. तुझे पोट म्हणजे वर्धमान असा ब्रह्मानंद ! नाभिकमल म्हणजे आनंदाचे सरोवर आणि नागबंद जो आहे तो तर ज्ञानबोधाचेच प्रतीक आहे. तुझे वस्त्र म्हणजे सृष्टीतील विशुद्ध सत्त्वगुण ! प्रकृती व पुरुष हे दोन्ही चरण दुमडून, त्यावर तू आनंदाने बसला आहेस. कारण तू त्या दोघांच्या अतीत असा प्रणवरूप परब्रह्म आहेस. तुझे दर्शन झाले की विघ्न शोधूनही मिळत नाही एवढा तुझा प्रताप आहे. तुझ्या हातात परशु आहे तो संसाराचे पाश तोडणारा आहे. तुला नमन असो. !"
नमन करितां गणेशा । करीतसे विघ्ननाशा ।।
लेखक : श्री दिवाकर अनंत घैसास

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

दैनंदिन एकनाथी भागवत

दैनंदिन एकनाथी भागवत

दैनंदिन एकनाथी भागवत